युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेवा !
युवा सेना! तरुणांसाठी लढणारी शिवसेनेची बलाढ्य अंगिकृत संघटना. महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ म्हणजे युवा सेना! युवा पिढीतील मत-मतांतरे, युवा वर्गाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे युवा सेना…!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेची स्थापना केली. लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने १७ ऑक्टोबर २०१० रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर युवा सेनेची स्थापना झाली. मुंबईत सुरु झालेल्या युवा सेनेच्या झंझावाताने अल्पकाळातच कधी आंदोलनांचे तडाखे, तर कधी शिष्टमंडळांसह भेटीगाठी घेऊन दिल्लीच्या तख्तालाही धडक दिली.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘युवा सेने’ची ‘युवा सेवा’ सुरू झाली आणि ‘युवा सेवे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली. विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे हेच युवा सेनेचे उद्दिष्टआहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या कोणाचा समावेश नसून महाराष्ट्रातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांनाच संघटनेच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. केवळ तक्रारींचा पाढा वाचत न बसता काही तरी नवीन, विधायक कार्य करून दाखवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या तरुण वर्गालाच संघटनेत स्थान देण्यात आले आहे. युवा सेना म्हणजे खऱ्या अर्थाने तरुणांनी तरुणांसाठी चालवलेली तरुणांची संघटना आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांतिकारक बदल घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून युवा सेनेने जे कार्य हाती घेतले आहे, त्या पद्धतीने आजवर एकही संघटनेने काम केलेले नाही.जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, तरुणांचे संघटन करून युवा शक्तीच्या उर्जेचा पुरेपूर वापर जनसेवेसाठी करावा हीच आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. त्यामुळेच ‘शिक्षण, आरोग्य आणि रोजगार’ या तीन क्षेत्रांत कार्य करणाऱ्या युवा सेनेचे अवघ्या वर्षभरातच व्यापक युवा चळवळीत रुपांतर झाले आहे. नव्या फळीचे नेतृत्व तयार करण्यासाठी झटणाऱ्या आदित्य ठाकरेंचे नेतृत्व असणारी युवा सेना आता महाराष्ट्राबाहेर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीरसारख्या राज्यातही आपले पंख पसरवू लागली आहे. राजकीय पार्श्वभूमी असली तरी युवा सेनेने राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही दमदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्योग क्षेत्र, समाजसेवा, कला, क्रीडा करमणूक क्षेत्रातील दिग्गजांना जोडण्याचे कामदेखील युवा सेनेने मोठ्या प्रमाणावर केले आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ आणि दिग्गजांना सोबत घेऊन नवा देश घडवण्याच्या देशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे शिवेसेनेच्या धर्तीवरच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणे हेच युवा सेनेचे उद्दीष्ट आहे कोणतेही नेतृत्व न लादता प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये नवे, उदयोन्मुख नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न युवा सेना करते आहे.