उद्ध्द.png    स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष जर कोणता असेल तो म्हणजे शिवसेना. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी घोषणा करूनच हा पक्ष जन्माला आला. घोषणाबाजी करणारे अनेक पक्ष व नेते आजच्या राजकारणात जागोजागी दिसतात. मात्र शिवसेनाप्रमुखांनी या घोषणेशी कायम इमान राखले. सत्ता मिळो अथवा न मिळो सामाजिक बांधिलकीचा वसा बाळासाहेब आणि शिवसेनेने कधी सोडला नाही. सामाजिक कामांच्या माध्यमातून शिवसेनेला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये पोहोचविण्याचे काम केले ते उद्धव ठाकरे यांनीच. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख जसे ‘लोकमान्य’ बनले तसेच उद्धव ठाकरे हेही आपल्या कामातून विश्वविक्रमी ‘लोकनायक’ बनले आहेत.

सौम्य असले तरी ते आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम असतात. दिलेल्या शब्दाला ते जागतात. उगाच नेत्याची झुल पांघरून न बसता अथवा बडेजाव न करता थेट कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. विशेष म्हणजे खोटेपणाची व चमचेगिरीची चिड असलेले उद्धव ठाकरे हे जनसामान्यांची कामे करण्याला प्राधान्य देतात. सत्ता हे केवळ साध्य नसून लोकांची कामे करण्याचे साधन आहे असे उद्धव यांचे मत आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिकांनाही ते आपलेसे वाटतात. राजकारणापेक्षा समाजकारणात रमणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर पावसाळ्यात मुंबईतील खड्डे हा चर्चेचा विषय बनला तेव्हा ते स्वतः खड्डे बुजविण्याच्या कामात सक्रिय झाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की मुंबईच्या आरोग्याच्या समस्या असो त्या सोडविण्यासाठी जीवाचे रान करण्याची त्यांची तयारी असते. यंदाही पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडले तेव्हा रात्री तीन तीन वाजेपर्यंत खड्डे बुजविण्याच्या कामावर त्यांनी जातीने लक्ष ठेवले होते. मलेरियाची समस्या उद्भवताच पालिका प्रशासनाच्या बैठका घेतल्या. स्वत: सर्व रुग्णालयांमध्ये फिरून उपचाराची व्यवस्था तपासून पाहिली. शिवसेनेच्यावतीने मलेरिया तपासणी व उपचार केंद्रे सुरू केली. शिवसेनेच्यावतीने ३० लाख रुपयांच्या औषधांचे वाटप केले. मुंबईची त्यातही उपनगरातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी योजना आखल्या. यातून आगामी काळात बोरिवली येथे भगवती, कांदिवली येथे शताब्दी, विलेपार्ले येथील कुपर तसेच जोगेश्वरी येथे रुग्णालये उभी राहिली आहेत वा उभी रहात आहेत. ही रुग्णालये उपनगरातील ६३ लाख लोकांसाठी काळाची गरज आहे.

२५ एप्रिल २०१० ला एनएसई संकुलात ‘रक्तदानाचा महायज्ञ’ आयोजित करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एका अलौकिक सामाजिक कार्याचे शिवधनुष्य उचलले आणि पाहता पाहता या महायज्ञाने शिवसेनेची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रखर सामाजिक बांधिलकी असल्यामुळेच अशक्य वाटणार हे विश्वविक्रमी सामाजिक कार्य सहज होऊन गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सामाजिक कामाविषयी दृढ निष्ठा व विचारांची बैठक असल्यामुळेच रक्तदानाचा महायज्ञ होऊ शकला.